“डॉ. आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात”.. संजय राऊत पुन्हा अडकले वादात

0

मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जोरदार टीका होत असून भाजपच्या नेत्यांनी राऊत यांना (Sanjay Raut Statement on Dr Ambedkar’s Birth Place) इतिहासाची पुस्तके पाठवून दिली आहे. तर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊत यांचा समाचार घेतला. “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतके सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.


“ ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्यांनी लोकशाही जन्माला घातली, त्या महाराष्ट्रात हे घडतेय. दुर्दैवं आहे महाराष्ट्राचे” असे वक्तव्य संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांपुढे बोलताना केले होते. त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. “अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध.” असेही चित्रा वाघ यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.


पुस्तके पाठवली-आशीष शेलार


राऊतांकडून डॉ. आंबेडकरांचा नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांना आम्ही डॉ. आंबेडकरांवरील दोन पुस्तके भेट म्हणून पाठविली असल्याची माहिती भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरु आहे. राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊतांकडून नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाकडून हिंदू देव-देवतांची टिंगल टवाळी केली जात आहे, असेही ते म्हणाले.

खट्टे छोले आणि अमृतसरी कुलचा रेसिपी | Khatte Chole Recipe & Amritsari Kulcha Recipe | Epi 55