सांगली – राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा (MVA Morcha in Mumbai) सरकारला धडकी भरवणारा असेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil) माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीतून दिला.
महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही माध्यम प्रतिनिधींना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यकर्त्यांवर हल्लाबोल करताना पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.
महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल… कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहे. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत असाही आरोप जयंत पाटील यांनी केले. गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात. हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल काहीही बोलतात त्याबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्विट नव्हे. हे किती धादांत खोटे आहे. हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्विट त्यांचे नाही. ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही ? ज्या दिवशी ट्विट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही त्यामुळे आमचे मुख्यमंत्री त्यांना शरण गेले आहेत का ? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपला महामोर्चात मिळेल. राज्यभरातून तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे अशा मुंबईच्या जवळ असलेल्या भागातील लोकं लाखो संख्येने येणार आहेत. महाराष्ट्र प्रेमी संपूर्ण ताकदीने मोर्चात उतरणार आहे. महामोर्चाची गर्दी पाहून नक्कीच राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरेल. हे सरकार भित्रे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकार का घेत नाही ? सरकारला कसली भीती आहे ? असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.