नाशिक : देवता आणि संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले असून वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात दिंडी काढून त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्याची (Protest Against Shiv Sena Thackeray Camp leader Sushma Andhare) मागणी केली. सुषमा अंधारे यांची वक्तव्य सोशल मिडियावरून सातत्याने व्हायरल होत असून त्यात त्यांनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचे दिसून आले. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते.
सुषमा अंधारे यांचा राज्यभर विरोध होत आहे. विशेषतः वारकरी समाजाकडून अतिशय आक्रमक भूमिका घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी वारकऱ्यांनी सुषमा अंधारे या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मते न देण्याची शपथ गंगासागर येथे घेतली होती. आता त्यांच्याविरुद्ध राज्यभर निदर्शने होत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींबद्धल वादग्रस्त बोलणाऱ्या अंधारे यांच्या विरोधात आळंदीमध्ये त्यांची प्रेतयात्रा काढून निषेध करण्यात आला.
नाशिकमध्ये काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत निषेध दिंडी काढण्यात आली. सुषमा अंधारे यांनी वारकरी संतांबद्दल आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्य विधान केले असून वारकरी संतांचा अपमान केल्याचा वारकऱ्यांचा आरोप आहे. त्यांना पक्षातून न काढल्यास उद्धव ठाकरे यांचा देखील निषेध केला जाईल, असा इशाराही वारकऱ्यांनी दिलाय. याप्रकरणी वारकऱ्यांच्या वतीने पंचवटी पोलिस ठाण्यात अंधारे यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात येत आहे.