बीएमसी घोटाळ्यात ईडीची छापेमारी सुरु, राजकीय वर्तुळात खळबळ

0

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED Raid in Mumbai) बुधवारी सकाळपासून मुंबईत तब्बल १५ ते १६ ठिकाणांवर छापेमारी केल्याची माहिती असून या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी सुरु आहे. यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्याशी ठिकाणांवर छापेमारी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोमवारीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत 12 हजार 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणाही राज्य सरकारने केली होती. भ्रष्टाचाराचा एक-एक पैसा आमचे सरकार वसूल करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त होता होता. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक भागिदार सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला पाच कोविड सेंटर्सचे कंत्राट मुंबई महाुपालिकेने दिले होते. कंत्राट दिले त्यावेळी ही कंपनीच अस्तित्वात नव्हती. ती नोंदणीकृत फर्मही नसल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात 100 कोटी रुपयांचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले. कोरोनाच्या काळात वैद्यकीय आणीबाणीच्या नावाखाली खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई पालिका प्रशासनावर करण्यात येत आहे. याशिवाय, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेने एप्रिल 2020 मध्ये रेमडेसिव्हिरची एक कुपी 1568 रुपयांना विकत घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तर, सरकारी हॉफकिन संस्थेने तेच औषध 668 रुपयांनी विकत घेतले होते. या कालावधीत बीएमसीने 2 लाख कुपी खरेदीचे कंत्राट दिले होते, असा आरोप होत आहे.