-तरंग फाउंडेशन व महामेट्रोचे आयोजन
नागपूर-तरंग फाऊंडेशन व महामेट्रोच्यावतीने झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. आयुष्मान मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार गोल स्पोर्ट्स अकॅडमीच्या विक्रमी योग प्रशिक्षक पल्लवी खंडाळे यांच्या नेतृत्वात सुमारे १०० लोकांनी योगासने केली.
महामेट्रोचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे डीजीएम अखिलेश हळवे, सुरक्षा विभागाचे डीजीएम संजय पांडे, सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक ए. के. स्वामी, स्टेशन इन्चार्ज ललित मीणा यांच्यासह या उपक्रमात अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंगचे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी झाले होते. तासभर चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरंग फाऊंडेशनच्या संगीता पांडे आणि गोल स्पोर्ट्सच्या युगा छेत्री यांनी केले. उपस्थित सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील रायफल नेमबाज हर्षल झाडे यांनी तरंग फाऊंडेशनकडून खेळाडूंना प्रशिक्षण आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. तरंग फाऊंडेशनच्या अध्यक्ष बरखा माथूर, कार्यकारी सचिव राजश्री खोत आणि साधना झा यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.