नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कर्नाटक विधानसभेसाठी १० मे ला मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार (Karnataka Assembly Elections Announced) आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबत घोषणा केली. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागा असून मागील निवडणुकीत २०१८ मध्ये भाजपने १०४ तर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरने अनुक्रमे ८० आणि ३७ जागांवर विजय मिळविला होता. यावेळीही राज्यात काँग्रेस, भाजप आणि जनता दल सेक्युलर असा त्रिकोणी मुकाबला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महिन्यांत 7 वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने ज्येष्ठ नेते बी.एस. येदुयुरप्पा यांना पुन्हा एकदा प्रचारात उतरविले आहे. कर्नाटकचे चारदा मुख्यमंत्रीराहिलेले 79 वर्षीय येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपचा प्रचार सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी 25 मार्च रोजी काँग्रेसने 124 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार कनकापुरातून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले. 23 मे 2018 रोजी अवघ्या सहा दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले होते.