जयेश पुजारीची पलायनाची योजना होती, पोलिस चौकशीत माहिती

0

नागपूर : बेळगावच्या तुरुंगातून कसेही करून बाहेर पडण्यासाठी कुख्यात गँगस्टर जयेश पुजारी याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात (Minister Nitin gadkari) धमकीचे फोन केल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या चौकशीत दिली. बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस येथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पोलिसांच्या कोठडीतून पसार व्हायचे, अशी त्याची योजना होती. पुजारी हा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला कैदी आहे. हत्येच्या दोन प्रकरणांमुळे पुजारीला झालेली फाशीची शिक्षा कमी होऊन त्याला जन्मठेप मिळाली आहे. मात्र, सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
जन्मठेप झाल्याने पुजारीला आयुष्यभर तुरुंगातच राहावे लागणार आहे. यामुळेच तो तुरुंगातून पळून जाण्याच्या योजनेवर काम करीत होता. त्याच्यातूनच त्याने बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी आणि पळून जाण्याची संधी मिळवण्यासाठी गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमक्या दिल्याची माहिती आहे. कालच जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना मिळाला. त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आता आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत आरोपी जयेश पुजारीने काही खुलासे केले आहेत. दरम्यान, पुजारीला बेळगाव कारागृहात फोन कसे काय उपलब्ध झाले, याची ही चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.