ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी (Vaibhav Kadam Suicide Case) घडली. कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वेमार्गा दरम्यान रेल्वेगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कदम हे सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते व ते जितेंद्र आव्हाड यांचे मंत्री असतानाचे अंगरक्षक होते. विशेष म्हणजे अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वैभव कदम यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे कदम यांनी नेमक्या कोणत्या कारणापायी आत्महत्या केली, हे जाणून घेणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या मारहाणीप्रकरणातही कदम यांना अटक झाली होती. याप्रकरणी ६ एप्रिल 2020 रोजी वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती. दरम्यान, पोलीस हवालदार वैभव कदम यांची हत्या झाल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.