अदानी घोटाळ्याच्या जेपीसी चौकशीस मोदी सरकार का घाबरते? पवन खेरा

0

मुंबई : अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करुन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे पण मोदी सरकार या चौकशीला का घाबरत आहे? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा (Congress Spokesperson Pawan Khera) यांनी विचारला आहे. अदानी प्रकरणी काँग्रेसने आज देशभर ३५ ठिकाणी डेमोक्रॅसी डिस्क्वालीफाईड पत्रकार परिषदा घेतल्या.

मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, अदानी उद्योग समुहावर मोदी सरकार विशेष मेहरबानी दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेंव्हा अदानीही त्यांच्यासोबत असतात, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी अदानींना कंत्राट देण्यासाठी व एसबीआयकडून कर्ज देण्यासाठी मेहरबानी दाखवली. श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्राचे कंत्राट देण्यासाठी श्रीलंका सरकारवर मोदींनी दबाव टाकला. बांग्लादेशातील वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानीला मिळावे यासाठी मोदींनी दबाव टाकला. एलआयसीच्या ३३ कोटी गुंतवणूकधारांचा पैसा अदानीच्या कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले. हा पैसा धोक्यात आला असून जनतेच्या पैशाची सुरक्षितता काय? हा प्रश्न आहे. सरकारी यंत्रणांचे छापे मारून, दबावतंत्राचा वापर करून अनेक महत्वाचे उद्योग अदानीच्या घशात घातले आहेत. अदानी-मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. पण मोदी सरकारने राहुल गांधी यांच्या भाषणातील मोठा भाग कामकाजातून काढून टाकला. मल्लिकार्जून खर्गे यांनी अदानीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचा भागही संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला. मोदी सरकार अदानी प्रश्नावर इतके का घाबरत आहे? ५६ इंचाची छाती व ३०३ खासदारांचे मोठे बहुमत असतानाही मोदी संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी करण्यास का घाबरत आहेत, असे खेरा म्हणाले. सावरकर मुद्द्यावर महाविकास आघाडीत फुट पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला.