मोस्ट वाँटेड अमृतपाल सिंग कुठल्याही क्षणी येऊ शकतो पंजाब पोलिसांच्या ताब्यात

0

अमृतसर : वारिस पंजाब दे या फुटीरतावादी संस्थेचा म्होरक्या व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग हा पंजाबमध्ये असून त्याच्या कुठल्याही क्षणी मुसक्या आवळल्या जाऊ शकतात. अमृतपाल हा अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात असलेल्या अकाल तख्त साहिब किंवा भटिंडा येथील तलवंडी साहिब येथील तख्त दमदमा साहिब येथे येऊन तो आत्मसमर्पण करण्याची शक्यता लक्षात घेऊन पंजाब पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. अमृतपाल सिंगने आत्मसमर्पणाची तयारी दर्शविली असून त्यासाठी काही अटी ठेवल्याची माहिती (Amritpal Singh) आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांना मोस्ट वाँटेड अमृतपाल सिंग हा कुठल्याही क्षणी पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. दोन्ही शहरांत नाकेबंदी करून वाहनांची झडती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. पोलिस कोठडीत त्याला मारहाण करू नये, त्याला फक्त पंजाबच्या तुरुंगातच ठेवावे आणि त्याच्या आत्मसमर्पणाला अटक म्हणून दाखवू नये, अशा या तीन अटी आहेत. मात्र, पोलिस त्याच्या या अटी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. काही धार्मिक नेते त्याच्या आत्मसमर्पणात मध्यस्थी करीत आहेत.
दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी एका संशयित इनोव्हा गाडीचा पाठलाग केला. ही गाडी फगवाडाहून होशियारपूरकडे जात होती. त्यात अमृतपाल आणि त्याचा साथीदार पापलप्रीत हे दोघे स्वार असल्याचे आढळून आले. यानंतर पंजाब पोलिसांच्या एका पथकाने त्यांचा 37 किमीपर्यंत पाठलाग केला. मात्र, इनोव्हा सोडून दोघे पसार झाल्याची माहिती आहे. यानंतर पोलिसांनी रात्रभर हा परिसर पिंजून काढला. दरम्यान, एका माहितीनुसार तो एका परदेशी वाहिनीला मुलाखत देण्यासाठी जालंधरला येत होता व त्यानंतर आत्मसमर्पण करणार होता. मात्र, पोलिसांनी त्याची योजना उधळून लावली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा