विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात घोषणा
मुंबई – महाराष्ट्रातही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून (Engineering and Medical Education in Marathi) सुरु केले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलताना (DCM Devendra Fadnavis in Vishwa Marathi Sahitya Sammelan) केली. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण स्थानिक मातृभाषेतून सुरु करण्याची घोषणा अनेक राज्यांमध्ये करण्यात आली असून मध्य प्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. भारतीय भाषा टिकवायच्या असतील तर या भाषांना ज्ञान भाषांमध्ये रुपांतरित करावे लागणार असून जोवर उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेवरील शिक्षण हे आपल्या मातृभाषेत होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा वैश्विक भाषा होऊ शकत नाही, असेही फडणवीस यावेळी सांगितले.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्वतःचा अनुभव सांगितला. तीस वर्षापूर्वी एका अभ्यासक्रमासाठी आपल्याला जर्मनीत नामांकन मिळाले होते. माझ्यासोबतचा चिनी विद्यार्थी त्यावेळी चिनी भाषेत अभ्यास करीत होता. फ्रेंच विद्यार्थी फ्रेंच भाषेत अभ्यास करीत होते. आम्हीच केवळ आम्ही इंग्रजीतून अभ्यास करीत होतो. जर्मनीने सर्व शिक्षण जर्मन भाषेत केले असून जगातील सर्वोत्तम इंजिनियर्स हे जर्मन आहेत. तीच शक्ती मराठी भाषेतही असून मराठी वैश्विक भाषा व्हावी, यासाठी मराठीला तेथे पोहोचविण्याचे काम करावे लागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मातृभाषा या ज्ञानभाषा व्हाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणात सर्व राज्यांना उच्च व तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम मातृभाषेत सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केेले असल्याचा उल्लेखही फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.
चौकट…
या संमेलनात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना सभागृहात बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.