तुरुंगातही पत्नीसोबत ‘खास’ भेट आमदाराची खास बडदास्त

0

चित्रकूट. तुरुंगात कैद्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागत असल्याचे आपण सारेच ऐकून आहोत. मात्र, पैसे मोजल्यास तिथेही सर्व इच्छांची पूर्तता करता येत असल्याचे अनेकदा उघड आले आहे. चित्रकुटच्या तुरुंगात (Chitrakut Jail) शिक्षा भोगणाऱ्या आमदाराची चांगलीच बडदास्त सुरू होती. त्याची पत्नी दररोज ‘खास’ भेटीसाठी तुरुंगात यायची. ३-४ तास तुरुंगाधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळील बंद खोलित ते एकत्र यायचे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अचानक छापा टाकून (Sudden raid by Uttar Pradesh Police ) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. अब्बस अन्सारी असे या आमदाराचे नाव आहे. बांदा तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा तो मुलगा असून मऊ मतदारसंघाचा आमदार आहे. तो सध्या चित्रकूट तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अब्बास अन्सारींची पत्नी निखत मागील अनेक दिवसांपासून दररोज सकाळी ११ वाजता कारागृहात येत होती. ती ३ ते ४ तास आत तुरुंगात पतीसोबत घालवल्यानंतर घरी जायची, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

तुरुंगात आमदार अब्बास अन्सारी दररोज आपली पत्नी निखत अन्सारीची गुप्त भेट घेत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर यूपी पोलिसांनी थेट तुरुंगात छापेमारी केली. यावेळी आमदार अब्बास अन्सारीची पत्नी निखत अन्सारी तुरुंगाधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळील एका खासगी खोलीत आढळली आहे. पत्नी निखत अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी निखत अन्सारी यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोबाईल आणि रोख रक्कमेसह इतर अवैध वस्तू आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी अब्बास अन्सारी यांच्यासोबत, पत्नी निखत अन्सारी, कारागृह अधीक्षक आणि तुरुंगातील इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
परवानगी शिवायच भेट
तुरुंगात जाण्यासाठी निखत कुणाचीही परवानगी घेत नसल्याचीही माहिती पुढे येत आहे. तुरुंगाच्या नोंदवहीतही निखत यांनी तुरुंगात प्रवेश केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही. आरोपी अब्बास अन्सारी आपल्या पत्नीच्या फोनवरून तुरुंगातून साक्षीदारांना धमकावत होता. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा