चंद्रपूर- देशात दरवर्षी दहा लाख हिंदू ख्रिश्चन किंवा मुसलमान होत असल्याचा दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उपाख्य भिडे गुरुजी यांनी येथे बोलताना केला. हिंदू समाज हा देहाने जीवंत असला तरी मनाने मेलेला असल्याचे सांगताना हिंदुंच्या याच वृत्तीमुळे पूर्वी मुघलांनी व नंतर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. हिंदू समाजाने आपले स्वत्व गमावल्याने देश पारतंत्र्यात गेला, असे भिडे गुरुजी म्हणाले. अग्रसेन भवनात रविवारी भिडे गुरुजी यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते.
आपल्या भाषणात भिडे यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केला. चीनसोबत केलेला शांतता करार कसा फार्स ठरला, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, चीनसोबतच्या शांतता करार केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात चीनने आपल्या देशावर आक्रमण केले आणि जवळपास 1 लाख 84 हजार मैलाचा भुभाग गिळंकृत केला. आपल्या राष्ट्रासाठी लागणारी पोटतिडक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. त्या संस्काराचे जतनही आम्ही करू शकलो नाही, अशी खंत भिडे यांनी व्यक्त केली. भिडे म्हणाले, आजही चिन आपल्या देशातून व्यापाराच्या माध्यमातून ६८ लक्ष कोटी रूपये दरवर्षी लुटून नेतो. स्वदेशीचे व्रत धारण करण्याऐवजी आपला हिंदू समाज हे उघडया डोळ्यांनी बघतो, याची लाज वाटली पाहिजे. आपला समाज हुशार आहे. केवळ त्याला स्वतःच्या संस्कृतीचा विसर पडला आहे. छत्रपतींची शिकवण ते विसरले आहेत. संस्कृतचा गंध नाही. 10 वीपर्यंत संस्कृत सक्तीचे करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.















