रा.स्व. संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांचं निधन

0

बंगळुरु-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री मदनदास देवी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ८२व्या वर्षी बंगळुरु येथे निधन झाले. मागील काही वर्षांपासून त्यांना मेंदूच्या आजाराने ग्रासले होते. सोमवारी पहाटे त्यांना देवाज्ञा झाली. उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मूळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असलेल्या मदनदासजी सी. ए., एल एल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६९ साली संघ प्रचारक बनले. त्यांच्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी आली. अभाविपचे मुंबई महानगराचे पदाधिकारी ते अखिल भारतीय संघटन मंत्री असा प्रवास साध्य करून त्यांनी सुमारे पस्तीस वर्षे देशभरातील विद्यार्थीवर्गाचे नेतृत्व केले. आणिबाणीच्या खडतर काळात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. विद्यार्थी परिषदेच्या जडणघडणीत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे यांच्यासह मदनदास यांचे लक्षणीय योगदान राहिले. त्यानंतर दहा वर्षे त्यांच्यावर रा. स्व. संघाच्या केंद्रीय स्तरावरील जबाबदारी आली. भाजपाशी समन्वयाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. सार्वजनिक जीवनात कार्य करताना मदनदास यांनी संघाचे सरकार्यवाह एच. दत्तात्रय, भाजप नेते सुशील मोदी, शिवराजसिंह चौहान, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील व दिवंगत प्रमोद महाजन, माजी केंद्रीय मंत्री स्व. अरुण जेटली, एच.एन. अनंतकुमार यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते घडविले.