“शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना, पक्षांना उघडं पाडा..”

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना कळकळीचे आव्हान, आम आदमी पार्टी निशाण्यावर


नागपूरः लोकांना मोफत योजनांचे आमिष दाखवून ‘शॉर्टकट’ चे राजकारण करणाऱ्या आम आदमी पार्टीसह इतर पक्षांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात चांगलाच समाचार घेतला. “देशातील राजकारणात येऊ घातलेल्या एका विकृतीपासून मी देशातील जनतेला सावध करु इच्छितो” अशी मुद्याची सुरुवात करून मोदी म्हणाले, शॉर्टकटचे राजकारण ही एक विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती… करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती… शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. व्होट बँक मजबू करण्यासाठी लोकांना आमिषं दाखवून सत्तेत येणे हाच यांचा हेतू असतो. ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ असे धोरण अवलंबिणारे लोक देश पोखरून काढतील,” अशा कठोर शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांचा समाचार घेतला.


मोदी पुढे म्हणाले, “खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू बाळगणारे कधीही देश घडवू शकत नाहीत. देश पुढील २५ वर्षांचं धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या औद्योगिक क्रांतीचा देश फायदा घेऊ शकला नव्हता. दुसऱ्या व तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचाही देशाला फायदा घेता आला नाही. पण आज देशात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली असताना ही संधी देश गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या देशांचे उदाहरण दिले. सिंगापूर हे पूर्व केवळ एक बेट होते. आता ते जगाच्या आर्थिक प्रगतीचे एक केंद्र बनले आहे. भारताकडे उशिरा का होईना ही संधी आली आहे. पूर्वी देशातील करदात्यांनी दिलेला पैसा भ्रष्टाचारासाठी किंवा मतांसाठी वापरण्यात आला. पण आता सरकारी तिजोरीतील पैशांचा उपयोग तरुण पिढीच्या उज्वल भविष्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. मी देशातील सर्व तरुणांना, करदात्यांना आवाहन करतो की, त्यांनी अशा स्वार्थी राजकीय पक्ष, नेत्यांना उघडे पाडावे”, असेही ते म्हणाले.


गोसेखुर्दचा उल्लेख


पूर्वीच्या सरकारमध्ये प्रकल्प कसे रेंगाळले जात होते व त्याचा आर्थिक फटका कशा पद्धतीने बसायाचा, हा मुद्दा स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले. गोसीखुर्द प्रकल्पाचा पाया ३०- ३५ वर्षापूर्वी रचण्यात आला होता. केवळ ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प तेव्हाच्या संवेदनाहीन कार्यशैलीमुळे वर्षानुवर्षे रेंगाळला व १८ हजार कोटींपर्यंत पोहोचला. २०१७ मध्ये डबल इंजिन सरकार बनल्यावर या धरणाचे काम वेगाने पूर्ण झाले, त्यासाठी सर्व अडचणी दूर करण्यात आल्या. यावर्षी गोसेखुर्द धरण पूर्ण भरणे शक्य झाले आहे. तीन दशकानंतरच या धरणाचा लाभ शेती व गावांना मिळू शकला, याकडे मोदींनी लक्ष वेधले.


समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी, नागपूर मेट्रोच्या टप्पा-१मधील उर्वरित मार्गाचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचा शिलान्यास, एम्सचे उद्धाटन व अजनी येथील रेल्वे इंजिन देखभाल दुरुस्ती डेपो तसेच चंद्रपूर येथील सिपेट प्रकल्पाचे लोकार्पण, आयसीएमआरचे संशोधन केंद्र, नॅशन इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ, नाग नदी प्रदूषण नियंत्रण व सौदर्यीकरण प्रकल्पासह अन्य प्रकल्पाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने एम्स रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हे विचार मांडले. यावेळी मंचावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा