अमरावती : आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, या शब्दात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतूक (MP Navneet Rana praises DCM Fadnavis) केले. फडणवीस यांचे पाऊल जेथे पडते, तेथे भाजपला नेत्रदीपक यश मिळते. फडणवीस यांचे काम बोलत असून त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्याचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामांची चर्चा होते. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असेही खासदार राणा म्हणाल्या. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. यावेळी खासदार राणा बोलत होत्या.
या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते.
वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम जेल!
दरम्यान, या जाहीरसभेत बोलताना फडणवील यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, कुणाचे वर्क फ्रॉम होम सुरु होते तर कुणाचं वर्क फ्रॉम जेल सुरु होते. एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वामुळे राज्यात सत्तांतर झाले व आपले सरकार आले. सहा महिन्यात या सरकारने दणक्यात काम सुरु केले असून अनेक योजना आखल्या आहेत. आधीच्या सरकारमध्ये केवळ पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न लावून धरले जायचे. पण आता सर्वसमावेश विकास आणि सगळ्या विभागांवर आपण लक्ष देतोय, असे फडणवीस म्हणाले.