अमरावती ः गेल्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवे उच्चांक स्थापित झाले. ‘वर्क फ्रॉम होम’ तर माहिती होते. पण, ‘वर्क फ्रॉम जेल’ बघायची पाळी आली. त्यांचे राजीनामे घेण्याची तत्कालिन मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नव्हती. शेवटी अख्खे मंत्रिमंडळच आपल्याला बदलावे लागले. आता राज्यातील नवीन सरकार प्रश्न झुलवत ठेवणारे नाही, तर गतीने निर्णय घेणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (DCM Devendra Fadnavis in Amravati)आज केले. अमरावती येथे भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदवीधर संमेलनात ते बोलत होते. अमरावती विभागातील भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या 5 वर्षांच्या सरकारच्या काळात टेक्सटाईल पार्क अमरावतीत झाला. आता पीएम मित्रामध्ये त्याचा आणखी विस्तार करायचा आहे आणि तो अमरावतीतच करायचा आहे. राज्यात आणखी गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. उद्योगांच्या पाठिशी उभे राहण्याचेच सरकारचे धोरण आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना अशा योजना राबबून शेतकर्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलो. एका समृद्धी महामार्गामुळे येत्या 5 वर्षांत काय परिवर्तन होणार, हे तुम्ही पहाच. रस्ते हे समृद्धीचे महाद्वार असते. आता येणार्या काळात वैनगंगा-पैनगंगा हा 82 हजार कोटींचा प्रकल्प करणारच.
रणजित पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षकांसाठी अतिशय चांगले काम केले. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्व खात्यांचे राज्यमंत्री तेच होते. प्रश्नोत्तरे असोत की लक्षवेधी एकदाही मुख्यमंत्र्यांना बोलवा, म्हणून कामकाज तहकूब करण्याची पाळी आली नाही. अतिशय गांभीर्याने काम करणारे ते आहेत, असे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 75 हजार भरतींची जाहिरात निघाली. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षांत पूर्णपणे भरती प्रक्रिया बंद होती. आता आपण सरकारी नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या सरकारमध्ये 2-4 हजार जागा काय काढल्या, प्रत्येक परीक्षेत घोटाळे केले. पूर्वीच्या सरकारांनी शिक्षकांना झुलवत ठेवले. आम्ही त्यांना 1100 कोटी रुपयांचे अनुदान दिले असले तरी त्याचा 5000 कोटी रुपये बोजा राज्य सरकारवर येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात ज्या मागण्या होत्या, त्यात ग्रॅच्युईटी आणि फॅमिली पेन्शनचे आदेश आम्ही लवकरच निर्गमित करणार आहोत. अन्य पक्षांसाठी विकासकामे हे तोंडाच्या वाफा आहेत, आम्ही ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम करतो. आम्हाला प्रश्न सोडविण्यात, जनतेत रस आहे, दुसरे आमचे कोणतेही विषय नाहीत. अडीच वर्षांत जे निर्णय झाले नाही, ते 6 महिन्यात घेण्याचे धाडस आम्ही दाखविले, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.