अमेरिकेत विमानसेवा ठप्प, विमानतळांवर हजारो लोक अडकले

0

वॉशिग्टनः विमानांना टेकॉफ किंवा लँडींगची माहिती देणाऱ्या प्रणालीत बिघाड झाल्यामुळे बुधवारी अमेरिकेतील विमानसेवा ठप्प होण्याचा अभूतपूर्व प्रसंग घडला. सुमारे चार हजारांवर विमानांना त्याचा फटका बसला असून अनेक विमानांच्या उड्डाणांना मोठा विलंब झाला आहे. यासंदर्भात उड्डाणसेवांचे नियंत्रण करणाऱ्या फेडरल एव्हिएशन एजन्सीने नोटिस टू एअर मिशन म्हणजेच नोटम यंत्रणा नादुरुस्त झाली असल्याची माहिती दिली असून ती कधी ठीक होईल हे सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे या संस्थेने सांगितले.
अमेरिकेची वृत्तसेवा एनबीसी न्यूजच्या माहितीनुसार, जवळपास 400 विमाने लेट आहेत. यामध्ये घरेलू आणि आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश आहे. अमेरिकन वेळेनुसार पहाटे 5.31 च्या सुमारास हा तांत्रिक बिघाड उघडकीस आला. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक कर्मचारी यंत्रणा दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत. आतापर्यंत एकूण 760 उड्डाणे रद्द किंवा उशीराने ऑपरेट केली जात आहेत. 91 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे हे घडले आहे. विमानसेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानोड्डाण सेवेत नोटम यंत्रणेच्या माध्यमातून विमांना टेकऑफ किंवा लँडिंगची माहिती मिळते. यासंबंधीचा डेटा विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिला जातो व नंतर तो वैमानिकांपर्यंत पोहोचविली जातो.