आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मंगळवारी कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी सकाळी एका प्रवाशाकडून १.२३६ किलो सोने जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारावर अधिकार्यांनी ही कारवाई केली. मुंबईहून गो एअर विमानाने नागपूर विमानतळावर आलेल्या या या प्रवाशाकडे पेस्ट स्वरूपातील ६८.६0 लाख रुपये किमतीचे सोने होते. अब्दुल रकीब (वय २५, रा. कर्नाटक, सध्या मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अब्दुल हा मंबई येथून गो एअर कंपनीच्या जी ८-२६0१ विमानाने सकाळी ८.0५ वाजता नागपूरला आला. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडे विविध नावांचे चक्क तीन आधार कार्ड आढळून आले. चौकशीत सोन्यासंदर्भात आरोपी अब्दुलला विचारणा केली असता त्याने हे सोने विदेशातून मुंबईत आल्यानंतर ते मी नागपुरात आणल्याचे सांगितले. हे सोने शहरातील एका व्यक्तीला देणार असल्याचेही त्याने सांगितले. परंतु, हे सोने मुंबईत कुणी दिले आणि नागपुरात कुणाला द्यायचे, यांची नावे त्याला माहिती नाही. अब्दुल हा नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर कस्टमच्या अधिकार्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे प्लास्टिकचे आवरण असलेले दोन पॅकेट अंतर्वस्त्रात लपविलेले आढळून आले. त्याच्या मोबाईलमध्ये सकाळच्या दोन कॉलची नोंद होती. एका तासानंतर त्याच्याच मोबाईलवरून संबंधित क्रमांकावर फोन केला असता दोन्ही स्वीच ऑफ होते. चौकशीनंतर त्याला विमानतळाबाहेर आणण्यात आले. परंतु, त्याला जो कुणी भेटायला येणार होता तो भेटलाच नाही. परिणामी त्याला कस्टम कार्यालयात आणण्यात आले. ही कारवाई केंद्रीय जीएसटी नागपूर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त रामचंद्र सांखला यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त अभयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर कस्टम्सचे एअर इंटेलिजन्स युनिटचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी, अधीक्षक विजय सुंदर, दीपक सोनटक्के, अविनाश पराते यांनी केली.