देशात सर्वप्रथम नागपूर विभागात ई-पंचनाम्याचा प्रयोग

0

 

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वेळेत, अचूक आणि गतीने पंचनामे होण्यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्वावर ‘ई-पंचनामे’ पद्धती राबविण्यात येत आहे. देशात व राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ई-पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना अविलंब मदत देणे शक्य होणार आहे. विभागातील नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

महसूल दिनाच्या औचित्याने श्रीमती बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रसार माध्यमांना ‘ई- पंचनामे’ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक, पशुधन आदिंचे होणारे नुकसान व त्याचे पंचनामे होवून शासनाकडून मिळणारा निधी ही सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतीमान करण्यासाठी नागपूर विभागात ‘ई-पंचनामा’ हा प्रायोगिक व अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२२ पासून यासंदर्भात मोबाईल अप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्य शासनाच्या महारिमोट सेंसींग विभाग (एमसॅक) आणि महसूल व मदत व पूनर्वसन विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या अप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर सुरु करण्यात आल्याचे, श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

असा होतो ई-पंचनामा

आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेवून अप्लीकेशनवर अपलोड करतात. अप्लीकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्वे व गट क्रमांक निहाय नुकसानीची ही माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांद्वारे भरण्यात येते. या माहितीची शेतकऱ्यांकडून आधीच ई-पीक पाहणीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीशी पडताळणी करण्यात येते. अंतिम भरून झालेली माहिती तहसिलदारांकडून तपासली जाते व त्यांच्या मंजुरीनुसार विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येईल. येथून ही माहिती राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार व राज्यशासनाच्या नियमानुसार शासनाने जाहीर कलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होईल, असे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३० हजार ५९९ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यासंदर्भात ५२ टक्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कामास गती देवून महसूल सप्ताहातच ५ ऑगस्ट पर्यंत उर्वरीत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यांना देण्यात आल्याचेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले.