
पुणेः “देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्टाइक केला होता. त्याची चर्चा आता होत असली तरी देशाचा पहिला सर्जिकल स्टाइक शिवछत्रपतींच्या काळात झाला होता”, असा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात बोलताना केला.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड झाली, यासाठी मी त्यांचे अंत:करणापासून अभिनंदन करतो, असा उल्लेख करून पवार म्हणाले, टिळक पुरस्काराला आगळे वेगळे महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला, याचा सर्वांना आनंद आहे. त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले, टिळकांनी 25 व्या वर्षी मराठी केसरी वृत्तपत्र आणि इंग्रजीत मराठा साप्ताहिकाची सुरुवात केली. केसरी आणि मराठाद्वारे टिळकांनी या देशातील परकीय लोकांवर प्रचंड प्रहार केले आणि लोकजागृती करण्याचे काम केले. पत्रकारितेवर दबाव असता कामा नाही, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी पाळली. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म पुण्यात झाला. त्या काळात दोन गटाचे नेते संघटनेत होते ज्यांना मवाळ आणि जहाल म्हणून ओळखले जायचे. जहालांचे नेतृत्त्व लोकमान्यांनी केले होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका जनमानसात मांडली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री मांडली आणि त्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचे आंदोलन त्यांच्या काळात मांडले. गणेशोत्सव, शिवजयंती असेल यातून लोकमान्याचे योगदान मोठे होते. त्या कालखंडात दोन युग होती. एक टिळक युग आणि एक महात्मा गांधींचे युग. दोघांचं योगदान आम्ही विसरु शकत नाही, असेही पवार म्हणाले.