पंढरपूर, (Nagpur )नागपूर- आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi )निमित्ताने पंढरीत आलेल्या लाखो भाविकांनी भूवैकुंठ गजबजून गेले आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरीत १० लाखांवर वैष्णवांची मांदियाळी जमली असून विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धापेवाड्यातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. (Pandharpur) पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी बुधवारी पंढरीत संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, रुक्मिणी माता अशा मानाच्या पालख्यांसह इतर संतांचे शेकडो पालखी सोहळे, हजारो दिंड्या दाखल झालेल्या आहेत.
सध्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दीड लाखांहून अधिक भाविकांची रांग असून दर्शनासाठी किमान २२ तासांचा कालावधी लागत असल्याची माहिती आहे. पदस्पर्श रांगेप्रमाणे मुखदर्शनाची रांगही मोठी आहे. प्रचंड परिश्रम घेऊन पंढरपुरात दाखल झालेल्या भविकांसाठी दर्शन रांगेत अनेक सोयी करण्यात आलेल्या आहेत. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, जेवण, शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. घुसखोरी होऊ नये यासाठी संपूर्ण रांगेत पोलिस बंदोबस्त आहे. पत्राशेड येथे किमान ४० हजारांवर भाविक आहेत. त्यांच्या सोयीसाठी फायबरची शौचालये उभारण्यात आली आहेत. रांगेत जागोजागी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रथमोपचार केंद्रेही आहेत. निराधार निवास येथे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यंदा भाविकांसाठी विशेष आरोग्य शिबीरे सुरु करण्यात आली आहेत.
महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब (Mohiniraj Kale)मोहिनीराज काळे व (Mangal Bhausaheb Kale ) मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. या महापुजेच्या दरम्यान यंदा दर्शनाची रांग अखंडपणे सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.