शरद पवारांच्या संमतीनेच ते सरकार स्थापन झाले होते-फडणवीस

0

(Mumbai)मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच २०१९ मध्ये राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शरद पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली होती व त्या बैठकीत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केला आहे. (DCM Devendra Fadnavis on government formation with NCP) एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही बाब स्पष्ट केली. फडणवीस यांनी सांगितले की, ऐनवेळी पवारांनी त्यावेळी माघार घेतली होती. तरी देखील अजित पवार यांना विश्वास होता की, शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले. मात्र, नंतर शरद पवार आमच्या सोबत आले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांनी सांगितले की, शिवसेनेशी युती अडचणीत आल्यावर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण सोबत स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करायला हवा, असा प्रस्ताव आला होता. या संदर्भात आमची शरद पवारांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सरकार स्थापनेचे अधिकार अजित पवार आणि मला देण्यात आले. हे सर्व ठरल्यानंतर शरद पवारांनी अचानक यातून माघार घेतली, असे फडणवीस यांनी सांगितले.
ती जाहिरात आणि वाद

सध्या (Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात उत्तम समन्वय असून एका छोट्या गोष्टीवरून मतभेद होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले की, ती जाहिरात देणे हे चूक होती हे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. त्यांनी स्वतःहून मला फोन केला. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असलेला मान मी त्यांना देतो तर मी उपमुख्यमंत्री असल्याचे ते मला कधीही जाणवू देत नाहीत. आज पर्यंत कोणत्याही युती सरकारमध्ये नव्हता एवढा समन्वय आमच्या दोघांमध्ये असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.