५ ठगबाज गजाआड
गोंदिया. श्रमाशिवाय अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी फसवणुकीचा (fraud ) मार्ग स्वीकारला आहे. ठगबाजीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. पण, गोंदीयातून (Gondia ) समोर आलेली घटना अगदी अकल्पित ठरली आहे. ठगबाजांनी आपल्याकडे चक्क नोटा तयार करणारे केमीकल (chemical that creates notes ) असल्याची बतावणी करून एकाकडून 10 हजार रुपये लाटले. आरोपींनी 10 हजारांच्या नोटा केमीकलमध्ये बुडविल्यास अडीच लाख रुपये तयार हेतील अशी थाप मारली होती. आमिषाला बळी पडून एकाने आपल्याजवळील 10 हाजारांच्या नोटा आरोपींकडे दिल्या होत्या. आरोपींनी हातचलाखीने या नोटा केमिकलमध्ये बुडवित असल्याचा देखावा करीत नंतर बंडलमध्ये बांधून दिल्या. हे बंडल उघडले असता निव्वळ कोरे कागदच हाती लागले. या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली आहे.
पिंटूकुमार सुंदरलाल बारमाटे (३२) रा. ए-४६, मलाजखंड वॉर्ड क्रमांक २०, जि. बालाघाट, दुर्गेश सिताराम मरसकोल्हे (३०) रा. बंजारीटोला, ता. बिरज, जि. बालाघाट, सियाराम महिपाल चौधरी (४२) रा. सतोना, गोंदिया, राजेश अमरलाल नेवारे (३०) रा. बालाघाट, विष्णू बाबुलाल पंधरे (४२) रा. पारगाव, ता. किरनापूर जि.बालाघाट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना बालाघाट टी पॉइंट येथून अटक करण्यात आली. त्यांनी सतोना येथील दिपांशू ब्रिकचंद उरकुडे यांना १० हजार रूपयाच्या नोटा एका केमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटा मधून अडीच लाख रुपये तयार होतात असे सांगून त्यांच्याकडून १० हजार रूपये घेतले. एक केमिकल टाकलेले नोटाचे बंडल पॅक करून परत दिले. दोन तासांनी उघडून बघायला सांगितले होते. उरकुडे यांनी बंडल उडघले असता आत नोटा नसल्याचे लक्षात आले. उरकुडे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जलदगतीने तपासचक्र फिरविण्यात आले. आरोपी कारमधून आल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या कारचा नंबर मिळविला. ती कार गोंदियाच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांनी काढली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाघाट टी पॉईट, गोंदिया येथे सापळा रचून नाकाबंदी केली. रावणवाडी कडून गोंदियाकडे येणाऱ्या त्या कारला थांबवून तपासणी केली असता त्या चारचाकी कारमध्ये ५ संशयित व्यक्ती दिसले. पोलिसा खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.