फुटाळाच्या संगीत कारंज्यांनी सी- 20 प्रतिनिधींना घातली भुरळ

0

 

नागपूर- फुटाळा तलावातील पाण्यातून गुंजणारे सप्तस्वर, पाण्याचा थुई-थुई नाच व रंगसंगतीमुळे तलावात निर्माण होणारा इंद्रधनुष्याचा भास. पाण्यासोबत येणारे आगीचे लोट व त्यातून तयार होणारी पाण्याची सुंदर ‘स्क्रीन’ आदीचा समावेश असलेल्या संगीत कारंजाच्या विशेष कार्यक्रमाने माता अमृतानंदमयी यांच्यासह सी-20 प्रतिनिधींना भुरळ पाडली. आकाशातील आतषबाजीने परिसर निनादून गेला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सी-20 परिषदेच्या आयोजन समितीचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कारंजाच्या माध्यमातून तयार झालेल्या स्क्रीनवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त शैलीने इंग्रजी भाषेत नागपुरचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला. जगविख्यात संगीतकार ए.आर.रहेमान यांच्या संगीत संयोजनाने सजलेल्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित सी-20 प्रतिनिधीं टाळ्यांच्या गजरात दाद देत होते. पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खादीचे स्टोल यावेळी पाहुण्यांना देण्यात आले.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा