गडकरी,म्हणाले शरद पवार म्हणजे जपानी गुडियासारखेच !

0

 

नागपूर : ‘शरद पवार यांचे व्यक्तीमत्व म्हणजे एखाद्या जपानी गुडियासारखे आहे. ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे असेच प्रत्येकाला वाटते, लोक कामाला लागतात, पण तिकीट भलत्यालाच मिळते असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना चिमटा काढला आहे. पूर्वी पानठेल्यावर अशी जपानी गुडीया असायची ती बघून प्रत्येकाला वाटायचे की ती आपल्याकडेच बघतेय असे स्पष्टीकरणही गडकरींनी दिले. भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या पद्ग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने हुडकेश्वर परिसरात आयोजित ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रभारी चैनसुख संचेती व जिल्हा, शहर आजी माजी आमदार ,पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात गडकरींनी अनेकांना चिमटे काढत कार्यकर्त्यांचे मनोरंजन, प्रबोधन केले.
गडकरी म्हणाले पद हे तात्पुरते आहे. काही नेते असे असतात जे पदावर गेल्यावर मान सन्मान प्रतिष्ठा मिळते… पण काही कार्यकर्ते असे असतात ज्यांना जनतेचे प्रेमही मिळतं प्रतिष्ठाही मिळते. कार्यकर्त्याप्रमाणे जनता हुशार आहे. व्यक्ती जेव्हा पदावर असते तेव्हा चंद्रशेखर बावनकुळेचा बावनकुळे साहेब होतो..लोक हुशार आहेत… जेव्हा मंत्री बनतो तेव्हा काही लोक प्रेम करणारे असतात काही लोक मंत्रीपदावर प्रेम करणारे असतात. शेवटी नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो म्हणूनच सांगतो चांगलं मिळण्याची अपेक्षा करा पण नाही मिळाले तर दुःख नाही अश्या पद्धतीने जगत कामाचा आनंद घेत रहा. आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगतात ते प्रयोग मी अध्यक्ष असताना करून चुकलो….ही आघाडी ती आघाडी…आपल्याकडे चॉकलेट वाटण्याची फॅक्टरीच आहे ना. 100 पदाधिकारी 40 सेक्रेटरी हे मी सगळं करून चुकलो आहे. आज तीन पक्ष असल्याने कोणाला कोणती सीट भेटेल याचेही काही खरं नाही असे सांगत त्यांनी भविष्याची चाहूल बावनकुळे याना करून दिली.