
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नाराजी निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर त्यांना कार्यक्रमाला न जाण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच केले आहे. “नाराज कशासाठी व्हायचं? काही नाही. शरद पवार यांनी कार्यक्रमाला जाऊ नये, अशी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची भावना आहे. आम्ही शरद पवार यांना सल्ला देणार नाहीत. पण साधारणपणे जे पाहतोय, वाचतोय, बोलतोय, ऐकतोय ते पाहिल्यावर समजते आहे की लोक अस्वस्थ आहेत. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, असे राऊत म्हणाले. शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये. त्यांनीच लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी भूमिकाही राऊत यांनी व्यक्त केली. त्याशिवाय याबाबत आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.