पश्चातापातून तरुणाची आत्महत्या
अकोला. मी जे काही कृत्य केले. ते अत्यंत वाईट आहे. मैत्रिणीला फसवले, माझ्या या कृत्यामुळे आई – वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागली. अनेकांचा रोष पत्करावा लागला. याचा मला खूप पश्चाताप होत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली (Youth committed suicide). शनिवारी दुपारी त्याने गुडधी मरघट रेल्वे मार्गावर (Guddhi Maraght Railway Line) रेल्वेगाडीसमोर स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपविली. मृतक आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेचा त्यांना जबर धक्का बसला आहे. मृत तरुणाविरुद्ध वर्षभरापूर्वी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्वराज्य दत्तात्रय हगवणे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सिसा – मासा येथील रहिवासी होता. स्वराजविरूद्ध वर्षभरापूर्वी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो बार्शीटाकळीतील एका महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षाला शिकत होता. त्याच्या आत्महत्येमुळे हगवणे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूनंत सिव्हिल लाइन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी स्वराजने दोन पानांची चिठ्ठी लिहून, त्यात पश्चाताप व्यक्त केला आहे. मी अत्यंत वाईट कृत्य केले असल्याची कबुली त्याने दिली आहे. मी मैत्रिणीला फसविले आहे. माझ्या कृत्यामुळे माझ्या आईवडलांना शरमेने मान खाली घालावी. याचा मला पश्चाताप होत असल्याचे त्याने म्हटले आहे. पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.
तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. पालकांनी वेळीच लक्ष घालून मुलांना सावरणे आवश्यक असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जातो. पण, मुलांच्या हालचाली घरी अगदी सामान्य असतात. अशात मुलांबाबत घरच्यांना फारशी माहिती मिळणे कठिण होते.