वणीत खळबळ, आरोपी आज्ञात
वणी. अज्ञात आरोपींनी अंगणात उभ्या असलेल्या बोलेरो जीपची काच फोडून त्यात ज्वलनशील पदार्थ टाकले. त्यानंतर वाहन पेटवून (Bolero jeep was burnt ) दिले. शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील वणी (Vani in Yavatmal district ) येथील प्रगतीनगरमध्ये ही घटना घडली. वाहनाला आग लागल्यानेतर पाणी टाकून विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दीर्घ परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. पण, तोवर वानहाचे मोठे नुकसान झाले होते. जाळलेली बोलेरो जीप माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते राजू तुराणकर यांच्या मालकीची आहे. या घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांना आरोपींचा सुगावा लावता आला नाही. तुरणकर यांच्या समर्थकांमध्ये रोष व्याप्त असून जीप जाळण्यामागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे. समाज कंटकांनी हे कृत्य केल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
राजू तुराणकर हे शनिवारी काही खासगी कामासाठी यवतमाळ येथे गेले होते. रात्री परत आल्यानंतर त्यांनी एमएच ३१- सीएस ७९०० क्रमांकची बोलेरो अंगणात उभी ठेवली. मध्यरात्रीनंतर बोलेरोतून धूर निघत असल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी लगेच याबाबत राजू तुराणकर यांना माहिती दिली. तोपर्यंत गाडीने आतून चांगलाच पेट घेतला होता. पाणी टाकून ही आग आटोक्यात आणण्यात आली. पण, तोवर आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. कुण्यातरी अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ज्या दगडाने वाहनाचा काच फोडण्यात आल्या, तो दगडही वाहनाच्या बाजूने पडून होता. यासंदर्भात राजू तुराणकर यांनी वणी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. आरोपी कोण, घटनेमागील कारण काय, हे अजूनही अस्पष्ट आहे. घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. हा शांतता भंग करण्याचा प्रकार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, तुरणकर यांचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये कामालीचा रोष दिसून येत आहे. आरोपींना तातडीने समोर आणण्याची मागणी केली जात आहे.