नागपूर: अमरावती विभागात सरासरीपार पावसाने हंगाम बाद झाल्याने नुकतीच अमरावती विभागीय आयुक्तांनी पाच जिल्ह्यातील ७,२०८ गावांमध्ये खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करुन तसा अहवाल शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविला आहे. पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम अतिवृष्टी व सततचा पावसाने बाधित झाला आहे. किमान दहा लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय सततच्या पावसाचे नुकसानीसाठी ८१० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्वच जिल्ह्यांत सरासरी पैसेवारी ४७ आल्याने सरसकट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी राज्याचे माजी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Former Energy Minister Nitin Raut) यांनी केलेली आहे. या संदर्भात नुकतेच त्यांनी माननिय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवले आहे.
अमरावती विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील १९५९ गावामध्ये ४६, अकोला जिल्ह्यात ९९० गावामध्ये ४७, यवतमाळ जिल्ह्यातील २०४६ गावामध्ये ४७, वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावामध्ये ४७ व बुलढाणा जिल्ह्यातील १४२० गावामध्ये ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमरावती विभागात ५० पैशांच्या आत पैसेवारी जाहीर झाल्याने दुष्काळाच्या सवलती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, विद्यार्थ्याना शालेय शिक्षन घेत असताना बोर्डाची परीक्षा फी माफ, रोजगार हमी योजनेची कामे इत्यादिचा समावेश आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित शासनादेश निर्गमित करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी त्यांनी पत्र लिहून केली आहे.