72 वी इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस,उद्या ना गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

0

नागपूर :इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन (IPCA) आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 72 व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस (IPC) चे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते शुक्रवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात होत असलेल्‍या या कार्यक्रमाला कोविड लसीची निर्मिती करण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावणारे भारतीय औषध महानियंत्रक व इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. सोमाणी हे नागपूरच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे (यूडीपीएस) माजी विद्यार्थी आहेत, हे विशेष. या परिषदेला प्रमुख वक्‍ते म्‍हणून एसीजी कॅप्सूल लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अजित सिंग यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री संजय राठोड, रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाच्या सचिव एस. अपर्णा, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्राचे आयुक्त अभिमन्यू काळे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष मोंटूकुमार पटेल, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉमिनिक जॉर्डन, समता समूहाचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, इंडियन फार्मास्‍युटिकल्‍स असोसिएशनचे अध्‍यक्ष डॉ. टी. व्‍ही. नारायण यांच्‍यासह डॉ. पंकज बेक्‍टर, डॉ. वदलामुंडी राव, डॉ. जयंत चौधरी, अतुल कुमार नासा, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
जानेवारी 1981 मध्ये इंडियन सायन्‍स कॉंग्रेसचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यानंतर चार दशकांनी नागपुरात ही 72 वी इंडियन फार्मास्‍युटीकल कॉंग्रेस होत आहे. विशेष स्मरणिका व प्रकाशन करण्‍यात येणार आहे.

यात फार्मा उद्योग मशीनरी व उपकरणांची प्रात्‍यक्षिके व नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केले जाणार आहे. हा एक्स्पो सर्वांसाठी खुला असणार आहे.
कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन आयोजन समिती अध्यक्ष अतुल मंडलेकर, सचिव प्रा.मिलिंद उमेकर, प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ. चंद्रकांत डोईफोडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर यांनी केले आहे. आयपीसीच्या उद्घाटनानंतर लगेचच सीईओ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कोरिया सारख्या विविध देशांमधून आलेल्‍या सुमारे 27 सीईओंची व्याख्याने आणि चर्चांतुन फार्मा उद्योगाची एकंदर परिस्थिती, वैद्यकीय उपकरणे, लसींची परिस्थिती, फार्मा उद्योगातील महिलांचे योगदान, गुंतागुंतीचे जेनेरिक अशा फार्मा उद्योगाशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर सीईओ मार्गदर्शन करतील.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा