अमरावती. अडचणीच्यावेळी मनापासून धावा केल्यास देवही मदतीसाठी धावून येतो, असे दंतकथांमधून सांगितले जाते. मात्र, अमरावतीतील (Amravati ) एका अल्पवयीन मुलीने दंतकथेतील भावार्थ प्रत्यक्ष अनुभवला. मित्रानेच अल्पवयीन मुलीचे ऑटोतून अपहरण (Kidnapping of a minor girl from an auto ) करीत एका गोदामात कोंडले. तिच्याकडे तो नको ती मागणी करीत होता. ती नकार देत होती, यामुळे त्याचा रागही वाढत होता. स्वतःचा बचाव करण्याचा कोणताही मार्ग तिला सूचत नव्हता. पण, तेवढ्यातच अनपेक्षितपणे गोदामाच्या दारावर थाप पडली. बाहेरून हाका देणे सुरू झाले. यामुळे आरोपी गोंधळला. त्याने स्वतःच मुलीला खिडकीतून ढकलून दिले (girl was pushed from the window). यात तिच्या डोक्याला व पाठीला मार लागला. यानंतर आरोपी स्वतःही पळून गेला. ती जखमी झाली असली तरी अब्रु वाचली. ३ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास नवीन बडनेरा (New Badnera ) भागात ही घटना घडली. हे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहम्मद एहफान मोहम्मद अकील (२०, रा. जुनीवस्ती, बडनेरा) असे आरोपीचे नाव असून बडनेरा पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध अपहरण, विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी आरोपीला दोन महिन्यांपासून ओळखते. काही दिवसांपूर्वी तो तिच्या शाळेजवळील दुकानात येऊन तिच्याशी बोलला होता. मला तू आवडतेस. माझे सोबत मैत्री करते का, अशी विचारणा केली. त्यावर तिने होकार भरला. त्यानंतर तो रोजच तिच्या शाळेत तिला भेटायला येऊ लागला. ३ मार्च रोजी सकाळी ती शाळेत जात असतांना आरोपी त्याचा ऑटो घेऊन आला. मला तुझ्यासोबत बोलायो आहे. माझ्यासोबत चल, असे म्हणून त्याने तिचे अपहरण केले. तिला एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये बसवून तो तिला नवीन बडनेरा भागातील एका गोडाउनमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याकडे अश्लिल मागणी केली. तिचा विनयभंग केला. तेवढ्यात काही लोक गोडाऊनबाहेर आले. ते जोरजोरात गोडाऊनचे दार वाजवू लागले. त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने मुलीला खिडकीतून बाहेर उडी मारण्यास सांगितले. तिने नकार दिला असता, आरोपी मो. एहफानने तिला खिडकीतुन खाली ढकलून दिले.
पोलिस ठाण्यावर पोहोचला जमाव
मुलीचा आवाज ऐकून दारावर थाप देणारी मंडळी खिडकीच्या दिशेने धावली. त्यानंतर संपूर्ण घटना समोर आली. ही मंडळी मुलीला पोलिसांत तक्रार करण्यास सांगत होती. त्याचवेळी आरोपीच्या बचावासाठीही काहीजण समोर आले. दोन्ही गट पोलिस ठाण्याबाहेर आमोरासमोर आले होते. पण, पोलिसांनी समयसूचकता दाखवित परिस्थिती हाताळली. दोन्ही गटांना शांत करण्यासोबतच गुन्हाही दाखल केला.