मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे. त्याबद्द्ल तक्रारही करण्यात आली आहे. मात्र, अशा धमक्या खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
‘राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाचा अकाउंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तकडे तक्रार दाखल केली. याची तत्काळ दाखल घेत राज्य शासनाने कारवाई सुरू केली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे व तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.