पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर. उपराजधानी नागपूरसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जात आहे. नागपूरहून बिलासपूरसाठी (Nagpur -Bilaspur Vande Bhart Exp.) पहिली वंदे भारत एक्स्प्रेस रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून या सेवेचा शुभारंभा केला. या सोबतच नागपूरच्या विकासात नवा अध्याय जोडला गेला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत देशात पाच वंदे भारत ट्रेन धावत आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सहावी ठरली आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आणि पूर्णपणे भारतात तयार झालेली ही पहिली रेल्वे आहे. ही गाडी अत्याधुनिक, पंचतारांकित सुविधांनी सुसज्ज आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लकार्पण करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. हिरवी झेंडी दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.
रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ९.३० च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. तिथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते रस्तेमार्गानेच नागपूर रेल्वेस्थानकाकडे निघाले. ते जाणार असलेल्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी होती. नागरिक हात हलवून त्यांचे स्वागत करीत होते. तर मोदींनीही वाहनातून हात दाखवित नागपूरकरांच्या उत्स्फूर्त स्वागताला प्रतिसाद दिला.
नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
-देशातील सहावी वंदे भारत एक्स्प्रेस
-नागपूरहून ६.४० तासात बिलासपूरला पोहोचता येणार
-रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया स्थानकावर थांबा
-शनिवार सोडून आठवड्याचे सर्व ६ दिवस धावेल
नागपूर, अजनी स्थानकांचा पुनर्विकास
या दौऱ्यात रेल्वेशी संबंधित अन्य कामांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, अजनी येथील लोकोमोटिवच्या देखभालीसाठी साकारलेला मेंटनन्स डेपोचे लोकार्पण, नागपूर –इटारसी तिसऱ्या रेल्वे मार्स परियोजनेच्या कोहळी- नरखेड खंडाचे लोकार्पण करण्यात आले.