पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रो सफर ; विद्यार्थी, प्रवाशांसोबत संवाद

0

मेट्रो प्रकल्प : पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, दुसऱ्या टप्प्याच्या कोणशिलेचे अनावरण


नागपूर. शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी अशा मेट्रो रेल्वेच्या टप्पा १ चे लोकार्पण आणि टप्पा २ च्या कोनशिलेचे अनावरण (Inauguration of phase 1 of metro rail and unveiling of cornerstone of phase 2) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi ) हस्ते करण्यात आले. त्यांनी मेट्रो सफरीचा आनंदही लुटला. यावेळी विद्यार्थी आणि प्रवाशांसोबत त्यांनी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी चांगलेच भारावलेले दिसले.
नागपूर रेल्वेस्थानकावरील सोहळा आटोपून पंतप्रधान मोदींचा ताफा मेट्रोच्या झिरो माईल येथील फ्रिडम पार्क स्थानकावर पोहोचला. तिथे मेट्रोच्या प्रदर्शनाचे अवलोकन केले. मेट्रोतूनच ते खापरी स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. या प्रवासादरम्यान उल्लेखनीय कार्य करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेतली. मोदींनी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. प्रत्येकासोबतची भेट अल्पवेळेची असलीतरी जीवनभर आठवणीत राहणारा प्रसंग असल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑटोमोटीव्ह चौक ते कस्तुरचंद पार्क आणि प्रजापतीनगर ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन या टप्प्यांचे लोकार्पण करण्यात आले. हे दोन्ही मार्ग पहिल्याच टप्प्यात पूर्ण झाले आहेत. या मार्गावरून वाहतूक सुरू झाल्याने नागपूरकरांना स्वस्त, सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा २ ची पायाभरणीसुद्धा यावेळी पार पडली. एकूण ८,६८० कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यांतर्गत बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र, हिंगणा, कन्हान खाण क्षेत्र आणि भंडारा मार्गावरील कापसीपर्यंत मेट्रेचे जाळे उभारले जाणार आहे. या सुविधेमुळे नागपूर लगतच्या भागातील नागरिकांनाही सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. २०३१ पर्यंत मेट्रोच्या प्रवासी संख्येत आजच्या तुलनेत ८ पटीने वाढ होण्याची शक्यता असून वार्षिक २२ कोटी प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील असा अंदाज आहे.