भरकटलेल्या वाघिणीची स्वगृही रवानगी

0

पाच तास चालले रेस्क्यू ऑपरेशन ; दोन दिवसांपासून मिरचीची शेतात होता ठाण


भंडारा. अलीकडच्या काळात मानव – वन्यजीव संघर्ष (Human – Wildlife Conflict ) टोकाला पोहोचला आहे. वाघांसह अन्य वन्यश्वापदांचा शेतशिवारासह मानवी वसाहतीत प्रवेश भविष्यातील धोक्याची घंटा ठरली आहे. विदर्भात सर्वदूर वाघ, बिबट्याकडून हल्ल्याच्या घटना सतत समोर येत आहेत (Incidents of attacks by tigers and leopards are constantly coming to light in Vidarbha). भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मांडेसरच्या (Mandesar in Mohadi Taluka of Bhandara District ) शेतशिवारात मिरचीच्या बागेत गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीने ठाण मांडला होता. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. संभाव्य धोका लक्षात घेत वनविभागाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ हाती घेतले. प्रचंड गर्दीच्या साक्षीने तब्बल पाच तास हे ‘जॉइंट रेस्क्यू ऑपरेशन’ (Joint Rescue Operation) चालले. त्यानंतरच वाघिणीला पकडण्यात यश आले. तिला यामुळे वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या या वाघिणीला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. तिनेही मोकळा श्वास घेतला.
मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवार मांडेसर परिसरात ही वाघिण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास २० किमी अंतरावर असल्याने नागरिकांकडून वाघिणीला जेरबंद करण्याबाबत कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत होता. वाढत्या दबावानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बिघिणीला पकडण्याचे निर्देश दिले. भंडारा वनविभागाचे कर्मचारी व आंधळंगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर सायंकाळी वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. तिची हालचाल थांबताच यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले.
पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर वाघिणीला तुमसर भागातील चिचोली लाकूड आगार येथे नेण्यात आले. यानंतर तिला बुधवारी मध्यरात्रीनंतर तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पिंजऱ्यातून मोकळे करताच वाघिणीने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. वाघिणीची दहशत घालविल्याने ग्रामस्थांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा वन्यप्राणी गावाच्या दिशेने येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.