
नागपूर(Nagpur), 14 मे 2026: ‘तेजस्वी पराक्रम आणि अदम्य साहसाचे प्रतीक’ असलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील ‘विद्युत भवन’ या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शंभूराजांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य आणि सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपुत्र शंभूराजांच्या शौर्याचे आणि त्यांच्या धोरणी राज्यकारभाराचे स्मरण यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी उपव्यवस्थापक (मानव संसाधन) अमित पेठेकर यांनी संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली. महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेला लढा आणि त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. महावितरणच्या सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यातर्फे त्यांना अभिवादन करण्यत आले.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर















