Home Artical Blog जागतिक पर्यावरण दिवस विशेस प्रसिद्धी पत्रक

जागतिक पर्यावरण दिवस विशेस प्रसिद्धी पत्रक

0

हरित क्रांतीचा महासंकल्प: शाश्वत आणि समृद्ध भविष्याकडे महावितरणची दमदार वाटचाल

नागपूर (Nagpur), 5 जून 2026: ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून आज महावितरणने ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या मंत्राचा उच्चार करत एका शाश्वत आणि हरित भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ऊर्जा असलेल्या महावितरणने आता केवळ वीजपुरवठा करण्यापलीकडे जात, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘हरित ऊर्जा, समृद्ध महाराष्ट्र’ हे ध्येय गाठण्यासाठी महावितरण आता संपूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.

शाश्वत ऊर्जेची नवी पहाट: महावितरणने ऊर्जा परिवर्तनाची मोठी लाट आणली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण पूर्ण झाले असून, त्यातुण राज्यातील तब्बल 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे केवळ शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होत नाहीये, तर 65 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ग्रामीण भागात 70 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

सौर ऊर्जेच्या या महासंवादात सामान्य नागरिकही मागे नाहीत: ‘प्रधानमंत्री सूर्यघर – मोफत वीज योजने’द्वारे राज्यातील 6 लाख 16 हजारांहून अधिक घरांवर छतावरील सौर प्रकल्प (Rooftop Solar) कार्यान्वित झाले आहेत, ज्यामुळे अनेकांचे वीजबिल आता ‘शून्य’ झाले आहे. याशिवाय, देशात सर्वाधिक 10 लाखांहून अधिक सौर कृषिपंप कार्यान्वित करून महावितरणने एक नवा उच्चांक गाठला आहे.

भविष्यातील ध्येय: 52 टक्के नवीकरणीय ऊर्जा: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली, 2030 पर्यंत 38 हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह एकूण 45 हजार मेगावॅट विजेची भर टाकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्राची नवीकरणीय ऊर्जेची क्षमता सध्याच्या 13 टक्क्यांवरून 52 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरणार आहे, कारण पुढील पाच वर्षांत वीज खरेदीत 82 हजार कोटींची बचत होणार आहे, ज्याचा थेट फायदा वीज दर कमी होण्यासाठी होईल.

तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरण केवळ मोठ्या प्रकल्पांवरच अवलंबून नाही, तर लहान बदलांनाही प्रोत्साहन देत आहे:
• गो-ग्रीन (Go-Green): कागदाचा वापर टाळणाऱ्या ग्राहकांना पहिल्या बिलात 12 महिन्यांसाठी 120 रुपयांची सवलत दिली जात आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
• ई-मोबिलिटी: प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी राज्यात ठिकठिकाणी ई-वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सचे जाळे विस्तारले जात आहे. राज्यात आजच्या घडीस 11 हजारावर ई- चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत
• ऊर्जा कार्यक्षमता: ‘वीज बचत म्हणजे पर्यावरणाची बचत’ हा मंत्र घराघरांत पोहोचवण्यासाठी एलईडी बल्ब आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
• हरित परिसर: महावितरणच्या प्रत्येक प्रकल्पात आणि उपकेंद्रांत वृक्षारोपणाद्वारे हिरवाई जपली जात आहे.

एक जबाबदार सोबती: महावितरण ही केवळ एक वीज कंपनी नसून, पर्यावरणाप्रती जबाबदार असलेला तुमचा मित्र आहे. “चला, आपण सर्वांनी मिळून सौर ऊर्जेचा स्वीकार करूया, वीज वाचवूया आणि किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करूया,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ‘हरित महाराष्ट्र’ आणि त्याद्वारे ‘हरित भारत’ हे स्वप्न पूर्ण करण्याचा महावितरणचा हा संकल्प, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उज्ज्वल आणि प्रदूषणमुक्त भविष्य सुनिश्चित करेल यात शंका नाही.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर