मुंबईः जून महिन्यात शिवसेनेत बंड होऊन आमदारांचा मोठा गट बाहेर पडला व राज्यात सत्तांतर झाले. त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. मात्र, आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडखोरीच्या बाबतीत (Leader Of Opposition Ajit Pawar on rift in Shiv Sena) मोठा गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेचे आमदार फुटणार ही माहिती आम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार देत होतो”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. “पवार साहेबांनी फोन करुन, मीटिंग केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे. पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला, तिथेच खरी गफलत झाली”असे पवार म्हणाले.
पुण्यात बोलताना अजित पवार यांनी त्यावेळचा घटनाक्रम सांगितला. “या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या. आमदारांना खुशाल जाऊ दिले गेले. मी देखील स्वतः उद्धवजींना सावध केले होते. पण मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन व तो आमचा पक्षांतर्गत मामला असल्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले होते” असा उल्लेखही अजित पवार यांनी केला.
जूनमधील शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडलेल्या शिवसेना आमदारांन नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता शिंदे गटाने शिवसेनेवर तसेच निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. त्याचा खटला निवडणूक आयोगापुढे सुरु आहे