नागपूरः भंडारा आणि गोंदियात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान केंद्रांवरील धान खरेदी प्रक्रियेला आणखी 15 दिवस मुदतवाढ देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनाला यांनी दिले आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. शासकीय धान केंद्रावर धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारीला संपुष्टात आली. त्यामुळे धान खरेदीचे पोर्टल्स बंद करण्यात आले होते. त्यामुळे भंडाऱ्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील 115 धान खरेदी केंद्रांवरील खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. धान खरेदी बंद झाल्याने हजारो शेतकरी अडचणीत आलेत. यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडल्यावर फडणवीस यांनी प्रशासनाला धान खरेदी प्रक्रियेला आणखी 15 दिवस मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतवाढीमुळे धान उत्पादकांना मोठाच दिलासा मिळणार आहे