Dr Ravindra Shobhane सरकारला सुनावण्याची फॅशन मी स्वीकारणार नाही- डॉ. रवींद्र शोभणे

0

नागपूर- shinde sarkar  सरकारला खडे बोल सुनावणे ही फॅशन ठरणार असेल तर ती मी स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांनी नागपुरात एका दैनिकाशी बोलताना मांडली. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan President Dr Ravindra Shobhane) यापूर्वीच्या संमेलनाध्यक्षांप्रमाणे तुम्हीही सरकारला खडे बोल ऐकविणार का? या प्रश्नावर बोलताना डॉ. शोभणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संमेलनातील भाषणात मी अलिकडच्या काळातील सांस्कृतिक, वाङ‌्मयीन तसेच सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने मांडणी करून ती साहित्यप्रेमी आणि राजकारण्यांपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिक रोखठोक भूमिका घेण्यास कचरतात, हे आपल्याला मान्य नसून दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, वसंत बापट अशा कितीतरी थोर साहित्यिकांनी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वैदर्भीय प्रतिभेची दखल नेहमी उशिरा घेतली जात असल्याचा आरोप आपल्याला मान्य नाही. मुळात साहित्यात मी प्रांतभेद मानत नाही. कारण विदर्भातील अनेक मोठ्या लेखकांना सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राने मान्यता दिली नंतरच विदर्भाने त्यांना स्वीकारले, असे डॉ. शोभणे यांनी स्पष्ट केले.

महानगरांतील तरुण पीढीचा इंग्रजीकडे ओढा असला तरी ग्रामीण भागात मराठी साहित्य वाचणारी नवी पीढी उदयाला येत असून ती खूप आश्वासक असल्याचे डॉ. शोभणे यांनी सांगितले. साहित्याच्या प्रांतात जातीय अस्मिता तीव्रतेने व्यक्त होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता डॉ. शोभणे म्हणाले की, वस्तुस्थिती काहीही असली तरी या क्षेत्रात सामंजस्य आणि सौहार्दाने एकत्र येणे आणि एकमेकांप्रती आदर ठेवून काम करणे अपेक्षित आहे.