मुंबई – लोकसभेच्या निवडणुका झाल्यास देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येऊ शकते, असे संकेत इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणातून (India Today-C Voter Survey) मिळाले आहेत. मात्र, महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसू शकतो व महाविकास आघाडीला मोठा फायदा मिळू शकतो, असे अंदाज या सर्वेक्षणात वर्तविण्यात आले आहेत. आताच निवडणुका झाल्यास एनडीएला 289 आणि यूपीएला 153 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. याशिवाय इतरांना 92 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून मांडण्यात आली आहे. मतांची आकडेवारी पाहता एनडीएला 43, यूपीएला 29 आणि इतरांना 28 टक्के मते मिळण्याचे अंदाज आहेत. जानेवारी महिन्यातच हे सर्वेक्षण पार पाडण्यात आले व त्यात 1 लाख 40 हजार 917 लोकांनी भाग घेतला, असा दावा सी व्होटरकडून करण्यात आलाय.
सर्वेक्षणाचे अंदाज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चिंतेत टाकणारे आहेत. आताच लोकसभेची निवडणूक झाल्यास राज्यात युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. तर भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसून एनडीएला केवळ १४ जागा मिळतील, असा दावाही सर्वेक्षणात करण्यात आलाय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात तत्कालीन भाजप व शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजपला २३ तर सिवसनेला १८ जागा मिळाल्या होत्या. तर युपीएला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपने राज्यात मिशन ४५ ची घोषणा दिली आहे.