“हिंमत असेल तर राजवस्त्र काढून बाहेर या !, खा. संजय राऊत यांचा ना. राणेंना इशारा

0

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध भडकले असून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धमक्या दिल्या (War of Words between Narayan Rane & Sanjay Raut) आहेत. अलिकडेच राणे यांनी “मी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा मार्ग मोकळा करत आहे” असे वक्तव्य केल्यावर राऊत यांनीही त्यांना इशारा दिलाय. “हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्र काढून बाहेर या. मग दाखवतो” असा पलटवार संजय राऊत यांनी राणेंवर केला आहे. “मी नारायण राणे यांची सगळी आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षे तुरुंगातून सुटणार नाहीत”, असा इशाराच त्यांनी दिलाय.
या वादाची सुरुवात सामना दैनिकातील अग्रलेखावरून झाली आहे. संतापलेल्या राणे यांनी संजय राऊत यांना तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. मी राऊतांचा तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करत असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यावर संजय राऊत यांनी “मला पुन्हा तुरुंगात जावे लागले तर मी तयार आहे. मी ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणार नाही. धाडसाच्या गोष्टी कोण करत आहे? मी अजूनपर्यंत नारायण राणे यांच्यावर काहीच बोललो नाही. ते आमचे सहकारी होते. नारायण राणे यांनी मला तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देऊ नयेत. त्यांना धमक्या द्यायच्या असतील तर राजवस्त्र बाजूला ठेवून या, मग मी दाखवतो. राणेंनी माझ्या नादाला लागू नये” असा इशारा राऊत यांनी दिलाय.
राऊत म्हणाले की, मला तुरुंगात धाडण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यांची नोंद मी करीत असून त्या नोदी आपण सरन्यायाधीशांकडे पाठवणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिलाय. राणेंची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षेही सुटणार नाहीत, असे राऊत म्हणाले. आता त्यावर राणेंच्या गोटातून काय प्रत्युत्तर मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा