“मला मंत्री करणार नसाल तर कार्यकर्त्याला करा पण..”..अपक्ष आमदार भोंडेकरांचा इशारा

0

भंडारा : शिंदे गटाचे भंडारा येथील समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. मला मंत्रिपद देणार नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या, मात्र बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला शंभर टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाराचे अपक्ष आमदार भोंडेकर यांनी (Independent MLA Narendra Bhondekar) दिलाय. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिलाय. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

 

आमदार भोंडेकर यांनी म्हटले आहे की, नवे सरकार येवून आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायलाच पहिजे ही माझीच नाही तर सर्व आमदारांची भावना आहे. वर्षभरापासून केवळ 20 मंत्र्यांवरच राज्याचा कारभार चालला असून आता संपूर्ण मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रमाणात करावा. मात्र, भंडारा जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री द्या, असे भोंडेकर म्हणाले.