
मंत्री दादा भुसे यांचा इशारा : संजय राऊत खोटे बोलत असल्याचा दावा
नागपूर. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात मत मांडताना काही पातळीपर्यंत टीका करण्याचे अधिकार देखील आहेत. पण, संजय राऊत (Sanjay Raut ) खोट बोलत जनतेची दिशाभूल करत आहेत. मालेगावच्या (Malegaon ) जनतेला आम्ही काय आहोत, ते माहिती आहे. जनता याला बिलकुल थारा देणार नाही. ते जर जास्तीच खोटे बोलले, तर उत्तर सभा आम्ही सुद्धा घेऊ, असा इशारा मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. ही रेकॉर्ड ब्रेक हा शब्दही कमी पडेल येवढी भव्य सभा होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण, सभेपूर्वीच भुसे यांनी ठाकरे गटाला स्पष्ट इशाराच देऊन टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड मध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन शिवसेनेकडून उत्तार सभा घेण्यात आली होती. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचे आयोजन केले होते. याच पार्श्वभूमीवर दादा भुसे यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
शिवसेनेतील बंडानंतर मालेगावात ठाकरे गटाची पहिलीच सभा आहे. मालेगावचे आमदार असलेले दादा भुसे हे देखील शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच दादा भुसे यांनीही भाष्य केले आहे. खासगी वाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना ते म्हणाले की, मालेगावच्या सभेसाठी अनेक पक्ष बदलून ठाकरे गटात आलेले काही लोक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातून गर्दी गोळा करण्यात येत आहे. याचा अर्थ नेत्याचा मालेगावच्या जनेतवर विश्वास नाही. बोलणाऱ्यांपेक्षा जनतेला काय वाटते, हे जास्त महत्वाचे आहे. जनता या गोष्टीला कंटाळली असून, थारा देत नाही. विकास, जनतेची सुख-दु:ख या गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त दोन दिवसांसाठी या गोष्टी करून चालत नाही. हजारो लाखो शिवसैनिकांनी कष्ट केले आहेत. सामान्य झोपडीतील शिवसैनिकाने जनतेची सेवा केली. त्यांच्या जिवावर शिवसेना उभी आहे. नेत्याच्या बाजूला चमचेगिरी करून शिवसेना उभी राहत नाही, असे दादा भुसे म्हणाले.