नागपूर : देशाच्या वेगवेगळ्या भागातील ४७ बँकांमध्ये सरत्या २०२२ सालात आर्थिक फसवणुकीची ६४ हजार ८५६ प्रकरणे नोंदविली गेली असून यात बँकांची ३९ हजार ६९८ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली (Bank Fraud in India) आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीच्या आधारे बँकेने मागील वर्षात झालेल्या बँक घोटाळ्यांची माहिती उघड केली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या घोटाळ्यांमध्ये फसवणुकीची सर्वाधिक १८ हजार ३३० प्रकरणे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या बँकेतील आहेत. या बँकेची ११८.६५ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
ॲक्सिस बँक लि.ची ६ हजार ८४२ प्रकरणांमध्ये ६३०.६९ कोटी रुपयांनी, एचडीएफसी बँक लि.ची २ हजार ६०८ प्रकरणांमध्ये ३०६.४० कोटींनी, आयसीआयसीआय बँक लि.ची ४ हजार ४२४ प्रकरणांमध्ये ६४५.८७ कोटी रुपयांनी, इंडूसलॅन्ड बँक लि.ची ५ हजार १८४ प्रकरणांमध्ये २२६.४३ कोटी रुपयांनी, आरबीएल बँक लि.ची ८ हजार ३५९ प्रकरणांमध्ये ३३१.५५ कोटी रुपयांनी, स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेची २ हजार ८९० प्रकरणांमध्ये ५१२.०८ कोटी रुपयांनी, स्टेट बँक ऑफ इंडियाची २ हजार ८७७ प्रकरणांमध्ये ५ हजार ५२७.४४ कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. इतरही बँकांची कमी अधिक प्रमाणात फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
बारा नागरी सहकारींचा परवाना रद्द
गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात येताहेत. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाच सहकारी बँकांवर निर्बंध लावले आहेत. या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात बारा नागरी सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.