
मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आली असून शिक्षणसेवकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ झाली असून राज्यातील अनेक नामांकित शिक्षण संस्थ व विद्यापीठांना राज्य सरकारने अनुदान जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय (Maharashtra Budget 2023-24) महाविद्यालये बांधली जाणार आहेत.
शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन 6000 वरुन 16,000 रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 9000 वरुन 20,000 रुपये करण्यात आले आहे. त्याशिवाय पीएमश्री 816 शाळांना 5 वर्षांत 1534 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीमध्ये वाढ
अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1000 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे. 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1500 वरुन 7500 रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली.
विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना अनुदान
राज्यातील काही शैक्षणिक संस्था व विद्यापीठांना सुमारे ५०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेय. यात विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, नागपुरातील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन अनुदान दिले जाणार आहे. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे होणार असून त्यात विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा या वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे सुरु होणार आहेत.