महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट!, ‘लेक लाडकी’ अभियान राबविणार

0

मुंबईः राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Budget 2023-24) यांनी महिला वर्गाला दिलासा देणाऱ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. पिवळया व केशरी क्षिधापत्रीका असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, चौथीत 4 हजार, सहावीत 6 हजार तर अकरावीत 8 हजार रूपये देण्यात येणार आहेत. लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. काल साजरा झालेल्या महिला दिनानंतर महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांना दिलासा
राज्यात 81 हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी 3500 तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन 4 हजार रुपये आहे. त्यात दीड हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये एवढे करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरून 5525 रुपये करण्यात आले आहे.
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.