Home political गरिबांना आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा : गडकरी

गरिबांना आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा : गडकरी

0

नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गरिबांना अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचे माझे स्वप्न आहे. उत्तर नागपुरातील डायग्नॉस्टिक्स सेंटर हे या दिशेने पहिले पाऊल आहे. आमचा हा प्रकल्प पूर्णपणे गरीब व गरजू नागरिकांना समर्पित असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लष्करीबाग, कमाल चौक येथे स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नॉस्टिक सेंटरचे भूमिपूजन नितीन गडकरी व संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी या कार्यक्रमाला विजयी भारत विकास संस्थेचे सचिव प्रभाकर येवले अध्यक्षस्थानी होते. तर, संस्थेचे कोषाध्यक्ष सारंग गडकरी, केतकी कासखेडीकर, एएमटीझेड कंपनीचे संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, डॉ. श्यामा नागराज, डॉ. नवल कुमार वर्मा, डॉ. अर्जुन तमय्या, यशोदा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रजत अरोरा, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास आदी

व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ‘डायग्नॉस्टिक्स सेंटर आमच्यासाठी पैसे कमावण्याचे माध्यम नाही आणि राजकीय स्वार्थासाठीदेखील हा उपक्रम नाही. माझ्या आईच्या नावाने स्थापन झालेल्या ट्रस्टच्या वतीने याचे संचालन होणार आहे आणि या कामाचा संबंध मानवतेशी आहे. माझ्या आईने स्वतःच्या संकटाच्या काळातही गरिबांची सेवा केली. ‘गोरगरीब जनतेला जेवढे देशील, त्याच्या दहापट मिळवशील,’ असा मंत्र मला आईने दिला. तिच्याच प्रेरणेतून हे सेंटर उभे होत आहे.’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त संजय टेकाडे, प्रकाश टेकाडे व दिलीप धोटे यांच्यासह गणेश कानतोडे, माजी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, डॉ. विक्की रुघवानी, संजय चौधरी, सुरेश कुमरे, प्रभाकर तारेकर, जगदीशप्रसाद आशिया, पी. सी. एच. पात्रुडू उपस्थित होत.