संघाशी संबंधित धडे अभ्यासक्रमातून हटवणार
सिद्धरमय्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
बंगळुरू, 15 जून : सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने आज, गुरुवारी मंजूर केला. या प्रस्तावाला गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी दिली.
यापूर्वी राज्यातील भाजप सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून धर्मांतर विरोधी कायदा लागू केला होता. त्यानंतर हे बिल सभागृहात आणण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसने या कायद्याला कडाडून विरोध केला होता. धर्मांतर विरोधी कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे सत्तांतरानंतर काँग्रेसने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच एच.के. पाटील यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने शालेय अभ्यासक्रमातून राष्ट्रायी स्वयंसेवक संघ आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेव यांच्याशी संबंधीत धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये भजन आणि संविधान प्रस्तावना वाचन बंधनकारक केले जाणार असल्याचे पाटी यांनी स्पष्ट केले.